आरोग्यभान – कोरोना उपचार आणि व्यवस्थापन
आपल्या शरीराची रचनाच अशी बनली आहे की, ती स्वतःच आपले आरोग्य व्यवस्थित ठेवण्याबाबत मूलतःच सक्षम असते. या ठिकाणी आपण याच मुद्दय़ांचा परामर्श घेणार आहोत. प्रामुख्याने कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या इशाऱयाच्या पार्श्वभूमीवर आपल्या अंगभूत नैसर्गिक प्रतिकारशक्तीला कसे सुरळीत ठेवता येईल, अधिक बलवान कसे करता येईल, शरीराच्या इतर व्याधी कशा नियंत्रित ठेवता येतील, याचा विचार करणे कोरोना उपचार आणि व्यवस्थापन या दृष्टीने अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे ठरेल. या महत्त्वाच्या मुद्दय़ांचा परामर्श घेतला आहे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे व नाशिकच्या पोलीस कोविड केअर सेंटरचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत यू. देवरे तसेच वरळीच्या आर. ए. पोदार मेडिकल (आयू) महाविद्यालयाच्या शरीररचना विभागाचे प्रमुख डॉ. दीपनारायण शुक्ला यांनी.
कोरोनाचा विषाणू जर शरीरात शिरला तर शरीर स्वतःच त्याला नष्ट करण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न करेल, हे उघड आहे. अर्थातच त्यासाठी तो शरीरात उपलब्ध असलेली संपूर्ण ऊर्जा, प्रतिकारशक्तीचा वापर करील. पण आपल्या शरीरात ही ताकद पुरेशी राखून ठेवणे हे आपल्या दैनंदिन सवयी, आहारविहार, खाणेपिणे यावरच अवलंबून असते. जर आपल्या या सवयी चांगल्या नसतील तर आपली प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा या बिनकामाच्या गोष्टींविरोधात लढण्यातच खर्ची पडेल. अशावेळी जर कोविड 19सारख्या घातक विषाणूने आपल्या शरीरात प्रवेश केला तर साहजिकच त्याला नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिकारशक्तीच आपल्याकडे नसेल. ही वेळ आपल्यावर येऊ नये याची खबरदारी सर्वांनीच घेतली तर कोरोनावर मात करणे सोपे जाईल.
कोरोना रुग्णांवरील उपचारांवरून असे लक्षात आले आहे की, रक्तातील घटकद्रव्ये आणि शरीराचे तापमान समतोल राखणे (होमिओस्टॅसिस) कोविड 19वरील उपचारांवरील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ज्या रुग्णांचा हा ‘समतोल’ राखला गेला त्यांना कोरोनाचा जास्त त्रास झाला नाही.
‘होमिओस्टॅसिस’चे दोन प्रमुख भाग करता येतील. 1) रक्त आणि 2) विषारी घटक. रक्ताच्या ‘होमिओस्टॅसिस’ची आणखी इतर भागांत विभागणी करता येते. उदा. रक्तातील साखर, ऑक्सिजन, पेशी, प्लाझ्मा, रक्तदाब, हृदयाचे स्पंदन, श्वासोच्छवास इत्यादी. कोरोना रुग्णांसाठी रक्तातील या सर्व घटकांचा समतोल आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी हाच महत्त्वाचा भाग ठरतो हे सगळय़ांनाच माहिती आहे.
रक्तातील साखर ः रक्तातील साखरेचे प्रमाण नॉर्मल राहणे कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ठरते. त्यासाठी कोरोना संसर्ग काळात रुग्णाला कमी कार्बोहायड्रेट असलेला आहार द्यायला हवा.
शिफारस ः जेवणातून गहू आणि तांदूळ पूर्णपणे वगळा. त्याऐवजी नाचणी, बाजरी यांचा वापर करावा. शिवाय इतर सेवनातून अकारण कार्बोहायड्रेट शरीराला मिळणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
रक्तातील ऑक्सिजन ः रक्तातील ऑक्सिजन हा आपल्या आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण त्याशिवाय रक्तपेशी जिवंतच राहू शकणार नाहीत. या पेशींवरच आपले जीवन अवलंबून असते. रक्तातील ऑक्सिजनचा समतोल राखण्यासाठी ‘रेड ब्लड सेल्स’ची संख्या पुरेशी असायला हवी. शिवाय फुफ्फुसाचे कार्यदेखील कमाल पातळीवर सुरू राहायला हवे.
शिफारसी ः रक्तातील ‘रक्तपेशीं’चे प्रमाण वाढण्यासाठी डाळिंब, बीट, कलिंगड, सफरचंद यांचा वापर आहारात करावा. त्याशिवाय दीर्घ श्वसनासह श्वासोच्छ्वासाच्या आदर्श सवयींनीही रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण नीट राहते. योगासने, प्राणायाम, अनुलोम-विलोम यांचाही यासाठी खूप उपयोग होतो.
रक्तातील ‘पीएच’ मूल्य ः मानवी रक्तातील ‘पीएच’ मूल्य 7.35 ते 7.45 यादरम्यान असायला हवे. ‘अल्कधर्मी’ पदार्थांचे सेवन जास्त झाले तर त्याचा विपरीत परिणाम रक्तातील ‘पीएच’ मूल्यावर होतो. प्रामुख्याने खूप मसालेदार प्रमाणाबाहेर शिजविलेले, भाजलेले अन्न हे यासंदर्भात घातक आहे. विशेषतः कोरोना रुग्णांनी तर ‘अल्कालाइन’ प्रकाशातील अन्नपदार्थ टाळायलाच हवेत. कोरोना उपचार आणि व्यवस्थापन यामधील हादेखील एक अतिमहत्त्वाचा भाग आहे. कारण अल्कलाइन अन्नाचे जास्त सेवन म्हणजे रक्ताचे घट्ट होण्यास, रक्तातील नको असणाऱया घटक द्रव्यांचा (टॉक्सीन) कचरा वाढण्यास आमंत्रण आणि रक्तप्रवाहातील अडथळय़ांना वाव.
शिफारसी ः रक्तातील ‘पीएच’ मूल्य कायम राखण्यासाठी हंगामी फळे, टमाटे, बीट, कडधान्ये यांचे सेवन करावे. शिवाय कोथिंबीर, कढीपत्ता आदींची पाने नुसती चावून खाणेही लाभदायक. मी स्वतः केलेली ‘ग्रीन ज्यूस’ची रेसिपी (http://youtube.pg UNNK1N_7A) या लिंकवर उपलब्ध आहे. बाजारातही ‘आपला’ या नावाने ते उपलब्ध आहे. रात्री झोपताना हळद आणि मिरी पावडर टाकून उकळलेले ‘गोल्डन दूध’ पिण्याने रक्त शुद्धीकरणाला मदत होते.
प्लाझ्मा, आयोनाइझ्ड कॅल्शियम ः आपल्या रक्तात निसर्गतः ठरावीक प्रमाणात कॅल्शियम असतेच. आहाराद्वारा जे कॅल्शियम आपल्या शरीरात जाते ते रक्तात मिसळत नाही. लहान आतडय़ात असलेले ‘व्हिटॅमिन डी’ हेच त्यासाठी प्रभावी ठरते. कोरोना संसर्ग आणि ‘ड’ जीवनसत्त्व यांचा खूप परस्परसंबंध असल्याचे आढळून आले आहे. साहजिकच कोरोना उपचारात ‘ड’ जीवनसत्त्वाची मात्रा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
सूर्यप्रकाश हा ‘ड’ जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे आणि हिंदुस्थानसारख्या उष्ण कटिबंधातील देशात तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याबाबतचा माझा स्वतःचा अनुभव पुरेसा बोलका आहे. ऑर्थर रोड कारागृहातील कोरोना पॉझिटिव्ह कैदी, नाशिक शहर पोलीस विभागातील कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांना मी हा प्रयोग करायला लावला आणि त्याचे खूप चांगले परिणाम मिळाले. ऑर्थर रोड तुरुंगातील 100 टक्के कैदी आणि नाशिकच्या कोविड सेंटरमधील 90 टक्के रुग्णांना त्यामुळे गंभीर परिणाम जाणवले नाहीत. ‘सनबाथ’ हा कोरोना रुग्णांसाठी खूप महत्त्वाचा नैसर्गिक उपचार आहे.
आता परत कोरोनाच्या तिसऱया लाटेचा इशारादेखील येत आहे. म्हणजे दोन लाटांशी लढूनही आपण या विषाणूला नष्ट करू शकलेलो नाही. तेव्हा आता तिसऱया लाटेशी लढण्यासाठी सज्ज होताना शरीराच्या इतर व्याधींचा प्राधान्याने विचार करून त्यावर मात करण्याचा, त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत आहारविहारात सकारात्मक बदल करूया. योगा, प्राणायाम यासह शारीरिक तंदुरुस्तीचे मार्ग अवलंबूया. ज्या सवयी अन्नपदार्थ आपल्या इतर व्याधींना पोषक ठरतील त्यांना टाळूया. कोरोनाची तिसरी लाट दरवाजावर धडक देत आहे. तेव्हा वेळीच सावध होऊया आणि निसर्गाच्या साथीने कोरोनावर मात करूया.
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातील सुमारे 180 कोरोनाबाधित केंद्रे आणि नाशिकच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतलेले पोलीस तसेच त्यांचे कुटुंबीय मिळून 500पेक्षा जास्त कोरोना रुग्ण यांच्यासंदर्भात आम्ही ‘आयुष’ मंत्रालयाने शिफारस केलेली उपचारपद्धती ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवलंबिली. हे सांगताना निश्चित आनंद होतो की, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी रुग्ण तर लवकर बरे झालेच, पण ‘मृत्यूदर’देखील शून्य राहिला. ऑर्थर रोड तुरुंगातील काही रुग्ण कैद्यांना वेगवेगळय़ा व्याधी होत्या. तरीही कारागृहातील सकारात्मक, मोकळे वातावरण, वर उल्लेखलेले उपचार यामुळे रुग्ण कैद्यांमध्ये लवकर सुधारणा झाली. या संपूर्ण अनुभवाच्या आधारे आम्हाला असे खात्रीशीर वाटते की, कोरोनाशी लढताना रुग्णाच्या इतर व्याधींवर आधी नियंत्रण मिळवून मग कोरोना विषाणूशी लढणे फायदेशीर ठरते. अर्थात हे एक सर्वसाधारण मत आणि निष्कर्ष आहे. गंभीर केसेसमध्ये वेगळा विचार होऊ शकतो.