विधानसभा अध्यक्षपदाची जागा काँग्रेसचीच, तिन्ही पक्षांनी एकत्रित निर्णय घ्यावा शरद पवारांचा सल्ला
विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेस पक्षाचीच असल्याचे स्पष्ट करतानाच यासंदर्भातील निर्णय महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित घ्यावा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची जागा ही काँग्रेस पक्षाचीच आहे. मात्र, या संदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र बसून घ्यावा आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी योग्य त्या उमेदवाराची निवड करावी, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. पण या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पुढचा कार्यक्रम कसा करायचा याबाबत चर्चा झाली. असा आग्रह आहे की, काही प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत यासंदर्भात चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.
- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे असून या कालावधीत कृषी कायदा पटलावर येईल, असे मला वाटत नाही. पण जर हा कायदा पटलावर आलाच तर सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. कृषी कायद्यांबाबत अनेकांनी काही बदल सुचवले आहेत. कृषी कायद्याबाबत राजू शेट्टी यांनी मागणी केली होती. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माझ्याशी याबाबत चर्चा केल्याचे पवार म्हणाले.
- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांची भूमिका तीव्र आहे. ते आंदोलन मागे घ्यायलाही तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून त्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे. त्यांना खिजवणे योग्य नसल्याचे शरद पवार म्हणाले.