Header

दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात ‘हत्ती’ची ‘तिरकी’ चाल

दिल्ली डायरी – उत्तर प्रदेशात ‘हत्ती’ची ‘तिरकी’ चाल

mayawati

>>नीलेश कुलकर्णी 

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय जाहीर करून बहुजन समाज पक्षाने तिरकी चाल खेळली आहे. उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॅक बेंचवर बसवून पंतप्रधान मोदी ड्रायव्हिंग सीटवर बसले आहेत. अशा परिस्थितीत कांग्रेससह इतर धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी एकत्र येऊन भाजपला आव्हान देईल अशी आशा होती. मात्र मायावतींच्या नव्या घोषणेने ती फोल ठरली आहे.

अनाकलनीय चाली आणि अचाट, अफाट निर्णयांसाठी मायावती कायमच चर्चेत राहिल्या आहेत. मात्र देशात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून मायावती शांत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. उत्तर प्रदेशात ‘ब्राह्मण शंख बजायेगा, हाथी आगे जायेगा’ अशी घोषणा देऊन मायावतींनी एकेकाळी सामाजिक व राजकीय क्रांती घडवली होती. मात्र नंतरच्या काळात मायावतींचा ‘पॉलिटिकल फॉर्म’ अचानक गायब झाला. विशेषतः अखिलेश यादव यांच्या उदयानंतर मायावतींचे केडर काहीसे खिळखिळे झाले. त्यातच मध्यंतरीच्या काळात मायावती व अखिलेश यांनी ‘आत्या–भाचे’ असे नवे राजकीय नाते निर्माण करून भाजपला शह देऊन पाहिला. मात्र मोदी लाटेत या नातेसंबंधाचा  प्रभाव पडला नाही. समाजवादी पक्षासोबत केलेल्या आघाडीचा बसपाला आजवर काहीही राजकीय फायदा झालेला नाही हे वास्तव आहे. आता तर त्यांनी एकला चलो रे अशी भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत त्यांची आघाडी होईल, अशी एक चर्चा होती. तथापि काँग्रेस व मायावती अशी आघाडी झाली असती तरी ‘एकादशीच्या घरी शिवरात्र उपवास सोडवायला गेली’ अशीच गत झाली असती हेदेखील खरेच.

उत्तर प्रदेशमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच झाले आणि त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून मौनात गेलेल्या मायावती अचानक प्रकटल्या. भाजपची ही नाटकबाजी असून दलित मतांच्या बेगमीसाठी हे सगळे चालले आहे, अशी कडाडून वगैरे टीका त्यांनी केली. योगींच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात दलित अत्याचारांमध्ये वाढच झाली हे खरे आहे. मात्र त्याबाबत मौन बाळगणाऱया मायावतींना आता अचानक दलितांबद्दल कंठ दाटून आला, हे विशेष. गेली काही वर्षे केंद्रीय तपास यंत्रणेचा भुंगा मागे असल्याने मायावती कोषात गेल्या होत्या. जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही न लढविण्याचा असाच अनाकलनीय निर्णय त्यांनी नुकताच घेतला होता. त्यामागे या तपास यंत्रणांचे भूत आहे अशीच चर्चा आहे. मात्र आता मायावतींनी अचानकपणे उसळी मारली आहे. भाजपवर त्यांनी घेतलेले तोंडसुख ही निव्वळ ड्रामेबाजी ठरू नये इतकेच. भाजप व मायावतींमध्ये छुपा समझोता झाला असल्याची राजकीय कुजबूज नेहमीच ऐकायला मिळते. भाजपला पूरक राजकारण करण्याऐवजी मायावती पुन्हा एकदा ‘सोशल इंजिनीअरिंग’चा नारा देऊन मैदानात उतरतात काय यावर बऱयाच बाबी अवलंबून आहेत. स्वबळाचा नारा देऊन मायावतींच्या हत्तीने एक तिरकी चाल खेळली आहे. बसपाचा हत्ती उत्तर प्रदेशात किती घरे पुढे जातो ते दिसेलच!

आझादांवर सरकार मेहरबान

gulam-nabi-azadराज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यावर केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार सुरुवातीपासूनच तसे मेहरबान आहे. अर्थात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गुलाम नबी म्हणजे राजकारणातले थोर जंटलमन आहेत. त्यांना शत्रू असा कोणी नाही. जम्मू-कश्मीरचे 370 वे कलम रद्द केल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरमधील यच्चयावत राजकीय पुढारी तुरुंगात डांबले. त्यात अब्दुल्ला पितापुत्रांच्या दाढय़ा तर हातभर लांबलेल्या सगळ्या जगाने पाहिल्या. याला अपवाद ठरले ते गुलाम नबी! अर्थात आझाद त्यावेळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने अशी कारवाई करता आली नाही. अर्थात सगळे माजी मुख्यमंत्री तुरुंगात डांबणाऱया मोदी-शहा यांना हेही नामुमकीन नव्हते. गुलाम नबींबद्दल त्यांना पहिल्यापासून ‘सॉफ्ट कार्नर’ आहे. आता तो पुन्हा अधोरेखित होण्याचे कारण म्हणजे राज्यसभेची टर्म संपून बराच कालावधी लोटल्यानंतरही गुलाम नबी यांच्या साऊथ ऍव्हेन्यू लेनमधील बंगल्याला सरकारने हात लावलेला नाही. एरवी मोदी सरकारने प्रियंका गांधींचा शासकीय बंगलाही ताबडतोब रिकामा करायला लावला होता. राष्ट्रीय लोकदलाच्या अजित सिंग यांच्या घरातले सामान रस्त्यावर टाकून बंगला मोकळा करण्यात आला होता. मात्र आझाद याबाबतीत सुदैवी ठरले आहेत. त्यांच्या बंगल्याला मुदतवाढ मिळाली आहे. त्यात काँग्रेसने आझादांकडून राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद काढून जवळपास त्यांना भाजपच्या झोळीत घातल्यात जमा आहे. ‘गुपकर गॅंग’च्या निमित्ताने केंद्रीय सरकार व जम्मू- कश्मीरमधील नेत्यांमध्ये नव्याने ‘गुटुर गुटुर’ सुरू झालेले असताना गुलाम नबी भाजपसाठी जम्मू-कश्मीरमध्ये मोठी भूमिका बजावणार काय याबाबत चर्चांना उधाण आले आहे. आझादांचा अबाधित राहिलेला शासकीय बंगला तरी तसेच संकेत देत आहे.

ये क्या हुआ पांडेजी?

‘कोण होतास तू, काय झालास तू?’ अशी अवस्था गुप्तेश्वर पांडे नावाच्या महाशयांची सध्या झाली आहे. आता हे पांडे कोण? हे जास्त विस्तारून सांगण्याची गरज नसावी. सुशांत राजपूत प्रकरणात बिहारचे पोलीस महासंचालकपदी असणारे गुप्तेश्वर पांडे एखाद्या राजकीय पक्षाचे प्रवत्ते असल्याप्रमाणे रोज मीडियावर आपले दर्शन देत असत. मीडियातील ही हवा पांडे महाशयांच्या इतकी डोक्यात गेली की, त्यांना राजकीय नेता बनल्याची स्वप्ने पडायला लागली. आपण नितीशबाबूंपेक्षाही लोकप्रिय आहोत असा भ्रम झाल्याने पांडेंनी हाती असलेल्या तालेवार नोकरीवर उदक सोडले आणि नितीशबाबूंच्या पक्षात प्रवेश केला. पांडेंना आता आपण आमदार होणार व त्यानंतर मंत्री याची जवळपास खात्रीच पटली होती. मात्र नशिबाने पलटी मारली आणि पांडेंचा पत्ता साफ झाला. एकेकाळी मीडियाचा प्रचंड झोत, त्यानंतरचा असा विजनवास यामुळे पांडेंची मनोवस्था दोलायमान होणे स्वाभाविकच होते. त्यामुळे पांडेंनी आता आपले उरलेले आयुष्य अध्यात्मास समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जीवन में ऐसा समय आता है की, जब आप जीवन के उद्देश को जानना चाहते है और भगवान को जानना चाहते है’, अशा पद्धतीची प्रवचने ‘कथावाचक’ म्हणून गुप्तेश्वर महाराज बिहारमध्ये जागोजागी करत आहेत. संपूर्ण आयुष्य पोलीस प्रशासनात नोकरी केल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱयांपेक्षा अगदी बदमाश नेताही चांगला असतो असाही साक्षात्कार गुप्तेश्वर महाराजांना झाला आहे. बाकी काही नसले तरी बिहारी जनतेचे कोरोना काळात या महाराजांमुळे मनोरंजन होत आहे हेही नसे थोडके! ‘करून करून भागले आणि देवाधर्माला लागले’. गुप्तेश्वरांनी हा देवाधर्माचा मार्ग कायम धरावा व मोठी आध्यात्मिक प्रगती साधावी इतकेच!

nileshkumarkulkarni@gmail.com

 



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article