मुंबईतील हिरे व्यापाऱयाला दोन कोटींचा गंडा, श्रीरामपूरच्या सराफ पितापुत्रांवर गुन्हा दाखल
मुंबईतील हिरे व सोन्या-चांदीच्या व्यापाऱयाला श्रीरामपुरातील सराफ पितापुत्रांनी दोन कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असून, पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब विश्वनाथ डहाळे व अक्षय बाळासाहेब डहाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश प्रकाश मेहता (47, रा. विलेपार्ले, मुंबई) यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
श्रीरामपूर शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश मेहता यांच्याकडून 1 कोटी 98 लाख 6 हजार 759 रुपयांचे सुवर्णालंकार व हिऱयांचे अलंकार खरेदी केले होते. त्यामुळे मेहता यांनी अलंकाराच्या रकमेची मागणी केली. मात्र, डहाळे पिता-पुत्रांनी मेहता यांना पैसेही दिले नाहीत आणि अलंकारही दिले नाहीत. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात पिता-पुत्रांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.