Header

निवडणुकीनंतरच्या हिंसेचे अधिवेशनात पडसाद, बंगालच्या विधानसभेत भाजप आमदारांचा गोंधळ

निवडणुकीनंतरच्या हिंसेचे अधिवेशनात पडसाद, बंगालच्या विधानसभेत भाजप आमदारांचा गोंधळ

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद शुक्रवारी विधानसभा सभागृहात उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी बाकावरील भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. त्यामुळे राज्यपाल जगदीप धनखड अभिभाषण न वाचताच मागे परतले. विधानसभेचे कामकाज अवघ्या पाच मिनिटांत तहकूब करावे लागले.

राज्यात सलग तिसऱयांदा तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जींचे सरकार सत्तेत आले आहे. ममता बॅनर्जींनी 5 मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सोहळ्यापासून राज्यपाल धनखड यांनी निवडणुकीनंतरच्या हिंसाचारावरून सरकारला जबाबदार धरले आहे. राज्यपालांच्या त्याच भूमिकेला अनुसरून शुक्रवारी दुपारी भाजप आमदारांनी विधानसभेच्या सभागृहात सरकारविरोधात फलक झळकावले. तसेच ‘जय श्री राम’, ‘भारतमाता की जय’चे नारे दिले. भाजप आमदारांच्या प्रचंड गोंधळामुळे राज्यपाल धनखड हे अभिभाषणाचे वाचन न करताच मागे परतले. विशेष म्हणजे, सरकारने तयार केलेल्या अभिभाषणातील तपशीलावर राज्यपालांनीही आक्षेप नोंदवला होता. मात्र अभिभाषण क@बिनेटमध्ये मंजूर झाल्याचे सरकारने सांगितले होते.

सरकार विरुद्ध राज्यपाल

10 मे रोजी 43 मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनखड यांनी हिंसाचारावरून ममता सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. सरकारलाच हिंसाचार हवा होता. बंगालमध्ये संविधान संपले आहे. रात्री हिंसाचाराच्या बातम्या कळतात व सकाळी सगळे ठीक असल्याचे सांगितले जाते, अशी गरळ त्यांनी ओकली होती. त्याआधी ममता बॅनर्जी व पाच मंत्र्यांच्या शपथविधीवेळी त्यांनी हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता.

– विधानसभेच्या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. सरकारने तयार केलेले अभिभाषण राज्यपाल वाचून दाखवतात. मात्र दोन दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखड यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे राज्यपाल सरकारने तयार केलेले अभिभाषण पूर्ण वाचतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भाजप आमदारांच्या गोंधळामुळे राज्यपाल अभिभाषण न वाचताच मागे परतले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article