युरो फुटबॉल चॅम्पियनशिप, उपांत्यपूर्व फेरीची रंगत आजपासून
युरो फुटबॉल चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरीची रंगत उद्यापासून सुरू होणार आहे. म्युनिचमध्ये इटली-बेल्जियम हे दोन बलाढय़ संघ आमने-सामने येतील. तसेच सेंट पिटर्सबर्गमध्ये स्वित्झर्लंडसमोर स्पेनचे आव्हान असणार आहे. या दोन लढतींमध्ये विजयी होणारे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
मॅनचिनी यांच्या संघाचे पारडे जड
बेल्जियमचा संघ सध्या फिफा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. इटलीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. पण मागील काही लढतींमधील कामगिरीवर नजर टाकता या दोन संघांमध्ये इतकी तफावत दिसून येणार नाही. इटली संघाचा मागील 31 लढतींमध्ये पराभव झालेला नाहीए. बेल्जियमनेही मागील 34 लढतींमध्ये किमान एक गोल केलेला आहे. तसेच मागील 27 लढतींपैकी 23 लढतींमध्ये बेल्जिमयने विजय संपादन केलेला आहे. या दोन्ही संघांनी युरो फुटबॉल चॅम्पियनशिपमधील साखळी फेरीच्या लढतीतही घवघवीत यश संपादन केलेले आहे. मात्र इटलीने बेल्जियमवर आतापर्यंत 18 लढतींमध्ये विजय मिळवलाय. दोन देशांमध्ये 22 लढती झालेल्या आहेत. बेल्जियमच्या संघाने फक्त चार लढतींमध्ये इटलीला हरवले आहे. त्यामुळे रॉबर्टे मॅनचिनी यांच्या इटली संघाचे उद्याच्या लढतीत पारडे जड असेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
आणखी एक धक्का देणार?
स्वित्झर्लंडने ए गटामधून चार गुणांची कमाई करीत पुढे वाटचाल केली. साखळी फेरीत या संघाने फक्त तुकाaला हरवले. पण अंतिम 16च्या फेरीमध्ये स्वित्झर्लंडने वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असे पराभूत करीत अंतिम आठपर्यंत मजल मारली. आता स्वित्झर्लंडसमोर स्पेनचे आव्हान असणार आहे. स्वित्झर्लंडचा संघ या स्पर्धेत आणखी एक धक्कादायक निकालाची नोंद करतोय का, हे पाहायला नक्कीच आवडेल.
महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत
बेल्जियमच्या दोन प्रमुख खेळाडूंना दुखापत झालेली आहे. त्यामुळे इटलीविरुद्धच्या लढतीत बेल्जियमचा प्रवास खडतर असेल. केव्हीन डी ब्रुएन व एडन हझार्ड या दोन स्टार खेळाडूंना इटलीविरुद्धच्या लढतीत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. त्यामुळे बेल्जियमची भिस्त रोमेलू लुकाकू, थॉमस म्युनियर, थोरगन हझार्ड, अॅक्सेल विटसेल, योरी टिलेमन्स या खेळाडूंवर असणार आहे.
अंतिम संघात कोणाची निवड?
इटली संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. त्यामुळे अंतिम संघात कोणत्या खेळाडूंची निवड करायची याचे टेन्शन रॉबर्टे मॅनचिनी यांना असणार आहे. अनुभवी जिऑर्जिओ किलिनी हा दुखापतीमधून बरा झालेला आहे. त्यामुळे त्याचे संघात कमबॅक होऊ शकते. फेडरिको किएसा व मॅटीओ पेस्सीना या मागील लढतीतील हिरोंना सुरुवातीपासूनच खेळवण्यात येते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. निकोला बरेला याच्याकडून आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
आजच्या लढती
स्वित्झर्लंड – स्पेन, सेंट पिटर्सबर्ग
रात्री 9.30 वाजता
बेल्जियम – इटली, म्युनीच
मध्यरात्री 12.30 वाजता
विजयरथ पुढे न्यायचाय
रॉबर्टे मॅनचिनी यांच्या मार्गदर्शनाखाली इटली संघाने मागील 31 लढतींमध्ये पराभवाचा चेहरा पाहिलेला नाही. इटली संघाचा हा राष्ट्रीय विक्रमही ठरलाय. बेल्जियमविरुद्धच्या लढतीत हा विजयरथ पुढे सुरू ठेवण्यासाठी इटलीचा संघ मैदानात उतरेल यात शंका नाही.