सध्या पूर्ण क्षमतेने लोकल चालवल्यास धोका वाढेल! टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांचा इशारा
>>> देवेंद्र भगत
मुंबई, दि. 1 – मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी कोविड अजून पूर्णपणे संपलेला नाही. यातच तिसऱया लाटेचा धोकाही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने लोकल चालवल्यास धोका वाढेल, असा सावधगिरीचा इशारा राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी ‘सामना’शी बोलताना दिला आहे.
n तिसरी लाट रोखण्यासाठी काय करावे लागेल?
– पुन्हा लाट येण्यासाठी साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. डेल्टा प्लससारखा बदल झालेला वेगाने वाढणारा विषाणू आला आहे. त्यामुळे गर्दी वाढल्यास ऑगस्टच्या मध्यावर दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे ही खबरदारी कोरोना पूर्णपणे जाईपर्यंत घेतली पाहिजे. ‘एमएमआर’ रिजनचा मोठा परिणाम मुंबईवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, पालघर, डोंबिवली अशा सर्वच भागांत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱयांची प्रशिक्षणे घेऊन नियम कठोरपणे पाळले गेले पाहिजेत.
n तिसऱया लाटेसाठी कोणती तयारी आहे?
– तिसरी लाट येऊच नये अशी अपेक्षा आहे. मात्र गर्दी वाढल्यास हा धोका वाढेल. यासाठी सरकारने पूर्ण तयारीने नियोजन केले आहे. बेडची संख्या 22 हजारांवरून 30 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. शिवाय तीन हजार आयसीयू आणि 1500 व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांना सर्वाधिक धोका वर्तवण्यात आल्यामुळे प्रत्येक सेंटरच्या ठिकाणी पीडिऑट्रिक वॉर्ड राहणार आहे. शिवाय जम्बो कोविड सेंटर आणि ऑक्सिजन बेडची संख्याही सर्वाधिक ठेवण्यात येणार आहे. पालिका स्वतः ऑक्सिजन निर्मितीचे 16 प्लँट उभारत आहे.
n तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणते आवाहन कराल!
– तिसरी लाट ही कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रादुर्भाव आणि नागरिकांकडून घेतली जाणारी खबरदारी यावर अवलंबून आहे. सरकार, पालिका चांगले निर्णय घेत आहे. याला नागरिकांची पूर्णपणे साथ मिळाल्यास दुसरी लाट लवकरच संपेल आणि तिसऱया लाटेचा धोकाही टळेल! मुंबईत सुमारे 50 लाखांवर लसीकरण झाले असून 10 लाख जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. मात्र एक कोटी 40 लाखांची मुंबईची लोकसंख्या पाहता जास्तीत जास्त जणांचे लसीकरण करून तिसऱया लाटेला दूर ठेवता येईल.