Header

परीक्षण – आशयसंपन्न साहित्य

परीक्षण – आशयसंपन्न साहित्य

shahani

>> प्रा. मिलिंद जोशी

मातीची मशागत केल्याशिवाय वृक्षांना हवे ते सत्त्व मिळत नाही. बुद्धीच्या संस्करणासाठी मनाची मशागत गरजेची असते. ती करणे विचारांमुळेच शक्य होते. असंख्य दिव्यांचा लखलखाट करून आसमंत प्रकाशमान करता येतो. अंतरीचा ज्ञानदीप प्रज्वलित करणे तितके सोपे नसते. मनाची मशागत आणि अंतरीच्या ज्ञानदीपाचे प्रज्वलित होणे ज्या विचारांमुळे घडते, त्या विचारांचे उगमस्थान ग्रंथात असते. नुसता आंब्याच्या झाडाला मोहोर येऊन चालत नाही, जीवन जाणिवांनाही मोहोर यावा लागतो. तेव्हा कुठे विचारसंपन्न जीवनाची फळे चाखता येतात. विचारसृष्टीचे अवलोकन केल्याशिवाय जीवनदृष्टी मिळत नाही. ती प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते. चांगल्या ग्रंथांच्या वाचनातून ती मिळते यावर अढळ श्रद्धा असणाऱया डॉ. वैभव ढमाळ यांनी ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ हा ग्रंथ वाचकांच्या हाती दिला आहे. जाणता वाचक तोच जो चांगल्या ग्रंथांचा शोध घेतो, त्या ग्रंथांचा आस्वाद घेतो आणि इतर वाचकांनीही त्या ग्रंथांचे परिशीलन करावे यासाठी प्रयत्नशील राहतो. डॉ. वैभव ढमाळ हे अशा जाणत्या वाचकांपैकी एक आहेत. त्यांनी उत्तम ग्रंथ केवळ वाचले नाहीत तर इतरांनी ते का वाचावेत यासाठी त्या ग्रंथांचे परिचय लिहिले. त्या ग्रंथातले त्यांना जे भावले ते इतरांना सांगितले. त्यातूनच त्यांचा ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. वाचकांच्या जीवनवाटा प्रकाशमान करणाऱया पुस्तकांविषयीचे डॉ. ढमाळ यांचे पुस्तक हे वाचकांना खूप काही देणारे आहे.

डॉ. ढमाळ हे इंग्रजी साहित्याचे अभ्यासक. त्यांनी इंग्रजी साहित्यावर पीएच.डी. संपादन केली. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या दूरस्थ शिक्षण विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. डॉ. वैभव ढमाळ यांचे लेखन दै. ‘सकाळ’, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, दै. ‘सामना’ या मान्यवर वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले. ‘सत्याग्रही विचारधारा’ आणि ‘सक्षम समीक्षा’ या मासिकांनी त्यांच्या लेखनाला स्थान दिले. डॉ. वैभव ढमाळ यांचे ‘वडील समजून घेताना’ हे त्यांच्या वडिलांविषयीचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी आपल्या वडिलांचे हृद्य चित्रण केले आहे. एका संशोधकाच्या निष्ठsने पाठपुरावा करून आणि मेहनत घेऊन त्यांनी ‘असवलीकर ढमाळ पाटील’ हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या ग्रंथाच्या रूपाने त्यांचा 160 पृष्ठांचा ग्रंथ वाचकांसमोर आला आहे.
‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या ग्रंथात डॉ. ढमाळ यांनी वेगळ्या धाटणीच्या 16 पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. त्याचे वर्गीकरण चरित्र-आत्मचरित्रात्मक पुस्तके, प्रेरक आणि मार्गदर्शक पुस्तके, सामाजिक आणि वैचारिक विषयांवरच्या कादंबऱया असे स्थूलमानाने करता येईल. बेअर ग्रील्स, वॉल्टर आयझॅकसन, लान्स आर्मस्ट्राँग, प्रा. मॅगी जी, रॉबिन शर्मा, रॅन्डी पाऊश, हारुकी मुराकामी, काझुओ इशिगुरो, अमिताव घोष, टोनी मॉरिसन या जगद्विख्यात लेखकांबरोबर डॉ. एस. एल. भैरप्पा, डॉ. आनंद यादव, डॉ. उमा कुलकर्णी, माधवी देसाई, प्रा. मिलिंद जोशी यांच्या त्यांना भावलेल्या पुस्तकांविषयी सविस्तरपणे डॉ. ढमाळ यांनी या पुस्तकात लिहिले आहे. लोकल टू ग्लोबल असा या पुस्तकाचा व्यापक परीघ आहे. इथली माती, माणसं आणि संस्कृती यांनाच लेखनाचे जीवनद्रव्य मानून लिहिणारे इथले लेखक आणि वैश्विक साहित्यात ठसा उमटविणारे लेखक यांच्या लेखनातला आशय, विषय, मांडणी, प्रयोगशीलता, त्यांना अभिप्रेत असणारी जीवनमूल्ये या मुद्दय़ांच्या आधारे या दोन्ही साहित्याचा तौलनिक अभ्यास करणे हे जिज्ञासूंसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. एकाच रंगाच्या फुलांनी सजलेल्या उद्यानापेक्षा नानाविध रंगांच्या आणि आकारांच्या फुलांनी बहरलेल्या उद्यानातली भ्रमंती अधिक प्रसन्नता देणारी असते. तोच आनंद आणि प्रसन्नता वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकांच्या समावेशामुळे या पुस्तकाच्या वाचनात मिळते हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे.

डॉ. ढमाळ यांची पुस्तकांचा परिचय लिहिण्याची शैली सुरेख आहे. त्यांच्या या परिचयातून पुस्तक वाचल्याचा आनंद तर वाचकाला मिळतोच, पण त्या वाचनातून आपल्या जीवनाला आहोत त्यापेक्षा अधिक उन्नत अवस्थेला नेण्यासाठी त्या पुस्तकातून आपण काय घेतले पाहिजे हेदेखील ते मार्मिकपणे सांगतात. त्यांचे लेखन समीक्षकी थाटाचे नाही. त्यामुळे ते जडता आणि रुक्षता या दोषांपासून दूर आहे. त्यांची भूमिका आस्वादकाची आहे. या पुस्तकाच्या वाचनातून जे त्यांच्या हाती लागले, तेच त्यांनी इतरांच्या हाती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. चांगली पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचावीत असे वाटत असेल तर ती का वाचली पाहिजेत हे वाचकांना समजेल अशा भाषेत सांगण्याची नितांत गरज असते. सध्याचा समीक्षा व्यवहार आत्ममग्न असल्यामुळे आणि त्यांना ठरावीकच पालख्या खांद्यावर उचलून धरण्याची सवय लागल्यामुळे अनेक चांगल्या पुस्तकांकडे दुर्लक्ष होते. पुस्तके चांगली असूनही ती वाचकांच्या कक्षेत येत नाहीत ही गोष्ट वाचन संस्कृतीसाठी हानीकारक आहे. म्हणून वाचकांचे बोट धरून त्यांना चांगल्या पुस्तकांपर्यंत घेऊन जाणाऱया डॉ. वैभव ढमाळ यांच्यासारख्या तरुण पिढीतल्या आस्वादक समीक्षकाचे काम आणि त्यातून साकारलेले त्यांचे ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. अशा लेखनातून नव्या पिढीच्या लेखक समीक्षकाचा व्यासंग, त्यांचे विविधांगी वाचन आणि प्रगल्भ आकलन याचेही दर्शन वाचकांना घडते. तेही विलोभनीय आहे.

चांगले पुस्तक एकांतात वाचताना त्या पुस्तकातल्या अनुभवांशी एकरूप होताना शब्दांच्या सोबतीने माणूस शब्दांच्या पलीकडे जातो. अनेकदा निःशब्द होतो. शब्दांपेक्षाही निःशब्द जाणिवांचे महत्त्व अधिक आहे. शब्द कानापासून मनापर्यंत जातात. निःशब्द जाणिवा मनापासून अंतरात्म्यापर्यंत जातात. ‘शहाणीव’ याच मार्गावर वास्तव्याला असते. पुस्तकांच्या रूपांनी तिचा परिसस्पर्श घडला तर जीवन उजळून जाते. हे सारे घडावे हाच डॉ. वैभव ढमाळ यांचा अट्टहास आणि स्वप्न आहे. ते पूर्णत्वाला जावे यासाठी त्यांच्या पुस्तकाला आणि पुढील लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा! जाणकार आणि चोखंदळ वाचक या आगळ्यावेगळ्या ग्रंथाचे आवर्जून स्वागत करतील अशी मला खात्री आहे.

शहाणीव देणारी पुस्तकं
लेखक ः डॉ. वैभव ढमाळ
प्रकाशक ः गोल्डन पेज पब्लिकेशन, पुणे
पृष्ठs ः 160, मूल्य ः रुपये 251/-



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article