राज्यांवर खापर फोडण्यापेक्षा आम्हाला लस पुरवा! आरोग्यमंत्री टोपे यांचा हल्ला
कोरोना लसीच्या नियमित पुरवठय़ाची हमी देण्याऐवजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यांतर्गत लसपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगत राज्यांवरच खापर फोडले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाच्या नियोजनाबाबत राज्यावर खापर पह्डण्यापेक्षा अखंडित लसपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी, असा टोला केंद्र सरकारला लगावला आहे.
नियमित लसपुरवठय़ाच्या मुद्यावर बोलताना टोपे म्हणाले, राजकीय आरोप-प्रत्यारोपात आपल्याला रस नाही. राज्यांनी कसे नियोजन करावे हे सांगण्यापेक्षा हर्षवर्धन यांनी अखंडित लसपुरवठा कसा करणार ते सांगितले तर बरे होईल. लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने देशात अग्रेसर असून याची कल्पना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना नक्कीच आहे. लसीचे डोस फुकट जाण्याचे प्रमाणही राज्यात खूप कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला अखंडित लसपुरवठा करावा त्यासाठीचे शंभर टक्के नियोजन आम्ही केले आहे. राज्यातील कोरोना रुग्ण व लोकसंख्येची आकडेवारी केंद्राकडे असल्याने महाराष्ट्राला लसीचे किती डोस दिले पाहिजेत याची नेमकी आकडेवारीही केंद्राकडे नक्कीच असायला हवी, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
z जून महिन्यात महाराष्ट्राला केंद्राकडून कोव्हिशिल्डचे 47 लाख 85 हजार 870 डोस मिळाले, तर कोव्हॅक्सिनचे 93 लाख 37 हजार 480 डोसपैकी 92 लाख 22 हजार 390 डोस मिळाले असून अद्यापि 15,090 डोस केंद्राकडून येणे बाकी आहे.
z जुलै महिन्यात केंद्राकडून 1 कोटी 15 लाख लसीचे डोस मिळतील असे सांगण्यात आले असून त्यापैकी 29 लाख डोस खासगी संस्थांना दिले जाणार आहेत. सवा लाख डोसपैकी आजघडीला 12 लाख डोस आले असल्याने रोज चार लाख डोसचे नियोजन केले जात आहे.
महाराष्ट्राला जास्तीतजास्त लसीचा साठा उपलब्ध करून देणे आवश्यक असतानाही तसा तो दिला जात नाही.
महाराष्ट्राकडे लसीचे डोस देण्याबाबत योग्य नियोजन आहे. रोज 15 ते 20 लाख डोस देण्यासाठी यंत्रणा सज्ज असताना केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस दिली जात नाही हे वास्तव आहे.